औरंगाबाद, दि. 7 : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराला आयएएस अधिकार्यांचे वावडे आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मनपा आयुक्त निपुण विनायक अंतर्गत राजकारणाला कंटाळून बदली करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याही बदलीची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात सध्या सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ असे तब्बल आठ आयएएस आयपीएस अधिकारी बदली करून गेले आहेत. विकासाची दृष्टी नसलेले राजकारणी आणि बरबटलेल्या व्यवस्थेचा झटका या अधिकार्यांना बसल्याचे बोलले जाते. त्यामुळे जिल्ह्यात आयएएस अधिकारी टिकत का नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढणारे शहर म्हणून औरंगाबादचा नावलौकिक ! मात्र गेल्या दशकभराच्या काळात शहराला अस्थिरतेचे गालबोट लागले. प्रशासकीय यंत्रणेवर राजकारण्यांचा वाढता दबाव, विकासकामांची झालेली कोंडी यामुळे आयएएस दर्जाचे अधिकारी जिल्ह्यात काम करण्यास इच्छुक नाहीत, असेही बोलले जाते. गेल्या दीड-दोन वर्षात मनपाला तिसरे आयुक्त मिळाले. तर दोन वर्षात उदय चौधरी हे तिसरे जिल्हाधिकारी आहेत. जिल्हा परिषदेतही हीच स्थिती आहे. गेल्या दोन वर्षात नवनीत कौर या तिसर्या सीईओ आहेत. विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची या अधिकार्यांची पदे अस्थिर झाल्याने शासकीय कामांचा पार बोजवारा उडाला आहे. सन 2016 मध्ये जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्या बदलीनंतर नवल किशोर राम जिल्हाधिकारी म्हणून आले. अवघ्या वर्षभरात त्यांची बदली झाली. आता उदय चौधरी हेही बदलीच्या प्रयत्नात आहेत. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यानंतर यशस्वी यादव अल्पकाळच टिकले. आता तिसरे पोलिस आयुक्त चिरंजिव प्रसाद कार्यरत आहेत.
बकोरियांचा बडगा नडला...
मनपा आयुक्त म्हणून ओमप्रकाश बकोरिया यांची कारकीर्द चांगलीच गाजली. भ्रष्टाचारी अधिकारी तसेच राजकारण्यांना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखविला. अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. मात्र अखेर त्यांचीही बदली करण्यात आली. त्यानंतर दीपक मुंगळीकर हे औटघटकेचे आयुक्त ठरले. तिसरे आयुक्त निपुण विनायकही आता नाराज आहेत. जिल्हा परिषदेत सीईओ अभिजित चौधरी यांच्यानंतर मधुकर राजे आर्दड यांनी वर्षभर कारभार पाहिला. त्यानंतर त्यांचीही बदली करण्यात आली. आता पवनीत कौर या तिसर्या सीईओ काम पाहत आहेत.